विभागीय शिक्षण संचालक कार्यालयातील शिपाई 26 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विभागीय शिक्षण संचालक कार्यालयातील शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 26 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. अतिरीक्त विषय मंजुरीचे काम उप संचालकांकडून करून देण्यासाठी लाच घेतली.

राजु पोपट खांदवे (वय 31) असे लाच घेताना पकडलेल्या शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजु खांदवे हा येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिपाई आहे. यातील तक्रारदार यांचे अतिरिक्त विषय मंजुरीचे काम विभागीय उपसंचालक कार्यालयात प्रलंबित होते. ते काम विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून करून देण्यासाठी खांदवे याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीसकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची पडताळणी एसीबीकडून करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सापळा कारवाई आज दुपारी बंडगार्डन परिसरात खांदवे याला तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती 26 हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिले आहे.

दरम्यान, उपसंचालकांकडून काम करून देण्यासाठी या शिपायाने लाच घेतल्याने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे खांदवे याने कोणाच्या सांगण्यावरून लाच घेतली याचा तपास आता एसीबीकडून केला जात असून, त्यात धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोणी लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचतप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com