रझा अकादमीच्या ‘या’ मागणीला मंत्र्यांनी दिले समर्थन, भाजपने केली ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रझा अकादमीने आता एका चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी ‘त्या’ मागणीचे समर्थन केले असून त्यासाठी केंद्र सरकारकडे लेखी शिफारस केली आहे. काही वर्षांपूर्वी ‘मुंबईतील आझाद मैदानामध्ये गोंधळ घालून महिला पोलिसांवर हल्ले रझा अकादमीने केले होते. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा गृहमंत्र्यांप्रमाणेच रझा अकादमीची पाठराखण करतात का ?, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पत्रकाद्वारे रझा अकादमीच्या या मागणीकडे लक्ष वेधले आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातीत अल्पसंख्याकांच्या काही बाबीना कडवा विरोध केला. मात्र, आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर झाले आहेत. त्यांना ‘त्या’ गोष्टीचे विस्मरण झाले का? असा सवाल देखील केशव उपाध्ये यांनी पात्रातून विचारला आहे.

‘द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी रझा अकादमीने केली आहे. या चित्रपटामुळे मुस्लिम लोकांच्या भावना दुखावतील, असे रझा अकादमीने म्हटले आहे. मात्र, इराणमधील दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी २०१५ मध्ये बनवलेल्या या चित्रपटावर इराण देशात बंदीची मागणी केलेली नाही. मग, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रझा अकादमीच्या ‘त्या’ मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्र सरकारकडे बंदीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

यातून सत्ताधारी आघाडीला ‘त्या’ धर्मियांचे लांगुलचालन करायचे आहे, हे स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरे यांचाही अनिल देशमुख यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे का?,’ असा प्रश्न देखील उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. रझा अकादमीच्या पत्राची तत्परतेने दखल घेणाऱ्या सरकारने श्री विठ्ठलाच्या आषाढी यात्रेकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मानाच्या वारीसाठी प्रत्यक्षात एसटीचे भाडेही वारकऱ्यांकडून वसूल केले, या सरकारला वारकऱ्यांसाठी काही करायची इच्छा नाही, असे दिसून आले आहे, अशी खरमरीत टीका देखील उपाध्ये यांनी केली आहे.