पराभूत आणि विधान परिषद सदस्यांना मंत्रीपद देवू नका !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना आणि विधान परिषदेतील सदस्यांना मंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी पत्रकार एस. एम.युसूफ, सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास आणि ए.आय.एम.आय.एम. बीड जिल्हा प्रवक्ता हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, नुकतेच 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्यात मतदान पार पडले आणि 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये काही जुने, काही नवे उमेदवार निवडून आले. काही मातब्बर ही पराभूत झाले. मातब्बरांचे पराभुत होणे त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांना सहन होईनासे झाले असे वाटत आहे. म्हणून जनतेने पराभूत केलेल्या राजकारण्यांना मंत्रिपद द्या. अशी मागणी होवू लागली आहे. ही मागणी व्यक्ती स्तोमाचे लांगूलचालन करणारी आहे. असे झाले तर लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडेल. तसेच जनतेने नाकारलेल्या राजकारण्यांच्या गळ्यात जर पराभूत होऊनही मंत्रिपदाची माळ पडणार असेल, तर मग जनतेच्या मतांचे मूल्य ते काय राहणार ? आणि पराभुतांना मंत्री करायचेच असेल तर मग मतदान तरी कशाला घ्यायचे ? तसेच निवडून आलेल्यांनी मग अशा पराभूत, पण मंत्री बनलेल्या राजकारण्याच्या तोंडाकडे काय फक्त पहात रहावे ? जर अशाप्रकारे पराभुतांना मंत्रिपद देण्यात येणार असेल, तर मग जनता आपल्या मतांची अवहेलना करणाऱ्या पक्षांच्या व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उठाव करू शकते. रस्त्यावर उतरू शकते.

जनता आता पूर्वीसारखी नेभळट राहिली नसून, जागी झाली आहे. अशा प्रकारे अष्टम कुष्टम करू पाहणाऱ्या राजकारण्यांचा कावा हाणून पाडण्यासाठी मोठा उद्रेकही होऊ शकतो. चांगल्या सुदृढ लोकशाहीमध्ये पराभूतांच्या मंत्री पदामुळे राजकारणी आणि जनतेमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. याकरिता जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनाच फक्त मंत्रीपद दिले गेले पाहिजे. पराभूतांना अजिबात मंत्रीपद देता कामा नये. तसेच मागच्या दाराने विधान परिषदेचे आमदार बनलेल्या सदस्यांनाही मंत्रीपद दिले जाऊ नये. आपण आपल्या पातळीवर सारासार विचार करून निर्णय घ्यावा. सर्वसामान्य जनतेला संघर्षापासून वाचवावे आणि कुठल्याही सबबीखाली पराभूत झालेल्यांना व विधानपरिषदेतील सदस्यांना मंत्रीपद देऊ नये. अशी मागणी एस.एम.युसूफ, सय्यद इलयास आणि हॅरिसन रेड्डी यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Visit : Policenama.com