पवारप्रेम दाखवू नका, माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न : मुख्यमंत्री

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – माढा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक ही माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यामुळे येथे पवारप्रेम कोणीही दाखवू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पार पडलेल्या यूतीच्या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व समविचारी आघाडीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना समज दिली. तसेच निवडणूकीच्या कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे संजय शिंदे यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. शिंदेचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा फारच जिव्हारी लागला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्र्यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. निंबाळकर यांनी सोमवारी भाजपा प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमाला माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आमदार प्रशांत परिचारक, माजी आ. शहाजीबापू पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह सातारा जिल्ह्यातील काही नेते उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पण येथून पवार यांनी मागार घेतली. याच वेळेला तेंव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव माढा मतदारसंघातून पुढे केले होते. महाआघाडीतील नेत्यांचा अंदाज घेतला. तेव्हा एक-एक नेता अंग काढून घेत असल्याचे लक्षात आले. संजय शिंदे यांनी शरद पवारांना आपण सहकार्य करणार आहोत असे स्पष्टपणे सांगितले. पवारांनी जेंव्हा माघार घेतली, त्यानंतर लगेच माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भाजपा प्रवेशाची चर्चा सूरू झाली होती. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय शिंदे यांना भाजपाकडून लोकसभा लढवण्यास सांगितले. पण संजय शिंदे यांनी त्यांना नकार दिला. त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी भाजपात प्रवेश दिला.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मोर्चेबांधणी करीत आहेत. त्यांनी यासाठी सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्व आघाडीच्या समविचारी नेत्यांना विचारात घेतले, या महाआघाडीत आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, माळशिरसचे उत्तम जानकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर आदींचा यामध्ये समावेश होता.