अजाणतेपणामुळे झालेल्या चुकीसाठी पार्थला फासावर लटकवणार का ? : अजित पवार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रचार सभांनीही जोर धरला आहे. त्यात माढा लोकसभा मतदार संघ हा सर्वाधिक गाजलेला मतदार संघ आहे. त्यामुळे येथे सर्वांच्या नजरा आहेत. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हा मावळ मतदार संघातून उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही सर्वांच्या नजरा आहेत. पार्थ पवार यांनी चर्चमध्ये जाऊन फादर सिल्वेंची भेट घेतली होती. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यावर पार्थ यांचे वडिल आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

पार्थ पवार नवीन आहे. आम्हीही निवडणुकीला उभे होतो तेव्हा आम्हाला मंदिरामध्ये, मशिदीत आणि चर्चमध्येही घेऊन जायचे. आम्ही नमस्कार करुन निघून यायचो. पार्थसोबत जे झाले ते मलाही योग्य वाटत नाही. मी आणि पवारसाहेब शपथ घेताना काळजी घेत असतो. नवीन काही लोक येतात तेव्हा त्यांच्याकडून काही चूक होते. पार्थने चर्चमध्ये जाऊन दर्शन घेणे हे फासावर लटकवण्यासारखी चूक नाही. अशी चूक माझ्याकडून घडली असती तर गोष्ट वेगळी होती. मीडियाने एवढा बाऊ करण्याची गरज नव्हती. तो अजून नवखा आहे. त्याला मी चार गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी त्याला चर्चमध्ये नेले होते. तो स्वत: गेला नव्हता. त्याच्याकडून अजाणतेपणामुळे, न कळत घडलं आहे हे मान्य आहे, असं म्हणत अजित पवारांनी त्यांची पाठराखण केली आहे.

तसंच, माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल. इतर तालुक्यांप्रमाणेच सांगोला तालुक्यातूनही संजय शिंदेंना आघाडी मिळाली पाहिजे, अन्यथा तुमच्या डोक्यावर उरलेले केसदेखील राहणार नाहीत असा सज्जड दमही अजित पवारांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांना दिला.