Lockdown 4.0 : नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होईल याबाबत शंका : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे केंद्र आणि राज्य सरकारांपुढे लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नाही. हा चौथा लॉकडाउन देशव्यापी आहे, पण तो काटेकोरपणे पाळला जाईल काय याबाबत शंका आहेत. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सर्वच ‘बंद’ आहे. त्या बंदच्या काळकोठडीतून बाहेर पडण्यासाठी लोक धडपडत आहेत, असे म्हणत शिवसेनेने लॉकडाउनवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनाच्या संपादकीय मधून शंका उपस्थित केली आहे.

‘लॉकडाउनमध्ये जनजीवनासाठी काही खास सूट दिली नाही. मेट्रो, रेल्वे सेवा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल, जिम वगैरे बंदच राहतील. त्यामुळे लोक खरोखर ‘बंद’चे पालन करू शकतील काय? असा सवालही शिवसेनेने केला आहे. स्थलांतरित मजुरांची पायपीट आणि ससेहोलपट सुरूच आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतून हे मजूर उत्तर प्रदेशात जायला निघाले तेव्हा त्यांना केंद्र सरकारने रोखले नाही. त्यांची व्यवस्था केली नाही.

उत्तर प्रदेशच्या सीमेवर हे लाखो मजूर पोहोचले तेव्हा त्यांना तेथेच अडकवून ठेवले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनीही महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामीळनाडू या चार राज्यांत अडकलेल्या कर्नाटकच्या मजुरांना आणि इतर नागरिकांना 31 मेपर्यंत कर्नाटकात प्रवेश मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे.बाजूच्या देशांतील अल्पसंख्याक हिंदूंना पायघड्या घालणारी ही सरकारे आज बाजूच्या राज्यांतील आपल्याच बांधवांना स्वीकारायला तयार नाहीत. या अमानुष अस्पृश्यतेस काय म्हणावे? अशा परिस्थितीत चौथ्या लॉकडाउनची घोषणा सरकारने केली म्हणून चिंता वाटते. लोकांची घरात बसायची तयारी आहे, पण भविष्याचा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.