भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहरीकरणाचे मोठे समर्थक होते, शहरीकरण हे सध्याचं वास्तव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विविध नागरी सुविधांच्या 7 प्रकल्पांचं व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे उद्घाटन केलं. यापैकी 4 प्रकल्प हे पाणीपुरवठ्यासंदर्भात आहेत. तर 2 प्रकल्प हे सांडपाण्याचे आहेत. एक नदी सुधारणेशी संबंधित आहे. यावेळी पीएम मोदींनी छठ पूजा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत राजकीय समीकरण सांधण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचं नाव घेता मोदींनी टीका केली आहे. स्वार्थी नीती आणि मतांचं राजकारण यामुळं प्रशासनावर दबाव येतो आणि यामुळं समाजातील वंचित आणि शोषितांना याचे परिणाम भोगावे लागतात असं मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “शहरांमध्ये नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी कनेक्शन जोडण्याचं काम सुरू आहे. अमृत योजनेनुसार, बिहारमधील 12 लाख कुटुंबांना शुद्ध पाणी पुरवठ्याचे लक्ष्य आहे. अद्याप 6 लाख कुटुंबांना ही सुविधा मिळाली आहे. लवकरच इतर कुटुंबांनाही ही सुविधा उपलब्ध केली जाईल. शहरीकरण वेगानं होत आहे आणि हे सध्याचं वास्तव आहे. फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरात झपाट्यानं शहरीकरण सुरू आहे. शहरीकरण ही एक समस्या आहे असं आपण मानत आलात परंतु माझ्या मते ही एक संधी आहे.”

पुढे बोलताना मोदी म्हणाले, “भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शहरीकरणाचं महत्त्व त्याच काळात लक्षात आलं होतं. ते शहरीकरणाचे मोठे समर्थक होते. गरीबांना सर्व सुविधा आणि संधी उपलब्ध होतील अशा शहरांची कल्पना त्यांनी त्यावेळी मांडली होती. म्हणजेच पुढे जाण्यासाठी अशा शहरांमधून तरुणांना अनेक संधी मिळतील. बिहारचे नागरिक देखील भारताच्या शहरीकरणात आपलं योगदान देत आहेत” असं म्हणत पीएम मोदींनी बिहारमधील 16 टक्के दलित मतांना सांधण्याचा प्रयत्न केला. बिहारमधील बहुतांश दलित मतं ही लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची एकगठ्ठा मतं समजली जातात.