कांदा साठवण मर्यादा वाढवुन देण्याची केंद्र सरकारकडे केली खा.डॉ.भारती पवार यांनी मागणी

लासलगाव – सध्या नासिक जिल्ह्यात कांदा खरेदी विक्रीची परिस्थिति बघता केन्द्राने व्यापारी वर्गाला कांदा साठवणूकीसाठी मर्यादा घालून दिल्याने कांदा व्यापारी चिंतित असून त्याला साठवणूक क्षमता मर्यादित केल्यामुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे .यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्यामुळे कांदा खरेदीवर परिणाम होत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

बऱ्याच ठिकाणी कांदा खरेदी बंद झाल्याने शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे. कांदा व्यापारी व शेतकरी यांचा कांदा खराब होऊ नये म्हणून तातडीने पुढच्या दहा दिवसांची मुदत देऊन विक्रिसाठी त्यांना परवानगी द्यावी. तसेच कांदा साठवणूक क्षमता ही वाढवून देण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्याकरिता तातडीने दिल्ली येथे जाऊन दिंडोरी लोकसभेच्या खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे त्यांचे दालनात केली आहे.

केन्द्र सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांची परवड होऊ देणार नाही व लवकरच व्यापारी वर्गाशी चर्चा करून सुवर्णमध्य काढू असे आश्वासन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खा. डॉ.भारती पवार यांना दिले.