पोलिसांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘हा’ नवा डाएट प्लॅन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस दलातील पोलिसांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील पोलिसांसाठी त्यांचा हा पहिला उपक्रम आहे. पोलीस दल निरोगी राहिले तर नागरिकांची सुरक्षा ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील याच भावनेतून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी पोलिसांसाठी ‘दीक्षित डाएट प्लॅन’ तयार केला आहे. तसेच नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात उपचार आणि मार्गदर्शनासाठी लवकरच केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातील साडेतीन हजार पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांची स्क्रीनिंग केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना योग्य सल्ला देण्यात येणार आहे.

पुढील एक वर्षात नाशिक पोलीस दलातील पोलिसांचा मधुमेह निम्याने कमी करण्याचा मानस असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले आहे. नाशिकनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि फिजिशियन असोसिएशनची मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लहान मुलांसाठी ‘दीक्षित डाएट’

१८ वर्षाखालील मुलांमध्ये वढता लठ्ठपणा, आळस याबाबदच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे डॉ. जगन्नाथ यांनी लहान मुलांसाठीही नवीन प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार मुलांना दिवसातून चार वेळा जेवण करावे मात्र गोड पदार्थ कमी खावेत, असा सल्ला डॉ. दीक्षित यांनी दिला आहे.