लॉकडाऊनमुळे इमारतींची दुरुस्ती रखडली : दबडे

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्यात लॉकडाऊनचे नियम लागू असल्यामुळे रहिवासी गृहरचना संस्थांच्या इमारतींची दुरुस्तीची कामे रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांना परवानगी देण्याची मागणी सहकारी गृहरचना संस्थांच्या वतीने बांधकाम व्यावसायिक सुरेश दबडे यांनी केली आहे.

हडपसर आणि उपनगरात मोठ्य़ा प्रमाणात नव्या-जुन्या इमारती आहेत. त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीचे कामे हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये करण्यात येत असते. उन्हाळ्यामध्ये सुट्या असतात म्हणून यावेळी ही कामे हाती घेतली जातात. परंतु, यंदा करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यात पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. शिवाय उपनगर आणि परिसरात करोनाबाधित रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून सक्त पावले उचलण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत अनेक इमारतींची कामे ही अर्धवट स्थितीतच बंद असल्याचे आढळून आले आहे.

पावसाळ्यापूर्वी या इमारतींची कामे न झाल्यास त्या इमारतींच्या नागरिकांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान उचलावे लागणार आहे. तसेच, पूर्वी ठरवण्यात आलेल्या किमतीत वाढ होऊन अधिक किंमत मोजावी लागण्याची भीती आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पुणे शहरातील अत्यावश्यक विकास कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. या काळात इमारतींच्या दुरुस्तीचीदेखील परवानगी प्रशासनाकडून देण्यात यावी, अशी मागणी गृहनिर्माण संस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाकडे दुरुस्तीची परवानगी मागण्यास आलेल्या इमारतींना परवानगी देण्यात येत आहे. साधारण अनेक इमारतींना आतापर्यंत परवानगीदेखील देण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक सुरेश दबडे म्हणाले, दुरुस्तीच्या कामासाठी जास्त मजुरांची गरज भासत नाही. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे मजूरवर्ग गावाकडे गेला आहे. त्यामुळे मजुरांची मोठ्या प्रमाणावर अडचण भासणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून ही कामे करता येतील. मात्र, त्यासाठी मुख्य समस्या मजुरांची भेडसावणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामावरील मजूर गावाकडे गेल्यामुळे अनेक कामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता, असे त्यांनी सांगितले.