मैदानातही अन् बाहेर देखील कोहलीच ‘विराट’, ‘ब्रँड’ व्हॅल्युमध्ये नंबर 1 ची ‘हॅट्रीक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटमधील अव्वल फलंदाज ‘रन मशीन’ विराट कोहली फक्त मैदानावरच नाही तर मार्केटमध्ये सुद्धा सुपरहिट आहे. कर्णधार म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करणारा विराट कोहली भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यू मध्ये सर्वांना मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे विराटने सलग तिसऱ्या वर्षी पहिले स्थान मिळवले आहे.

ब्रँड व्हॅल्यूच्या बाबत विराटने बॉलिवूडचे स्टार अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणबीर सिंह, शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराणा, ह्रितिक रोशन , टायगर श्रॉफ, यासारख्या कलाकारांना देखील मागे टाकले आहे. क्रिकेटपटूंचा विचार केल्यास माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी, हिटमॅन रोहित शर्मा हे पहिल्या वीसमध्ये आहेत.

अमेरिकेच्या ग्लोबल अ‍ॅडव्हाझरी फर्म डफ अ‍ॅण्ड फेल्प्सच्या रिपोर्टनुसार विराटची ब्रँड व्हॅल्यू 237.5 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 1 हजार 691 कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू 23 मिलियन डॉलर इतकी आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू रोहितपेक्षा 10 पट अधिक आहे.