भाजपाचेच 8 आमदार दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मणिपूरमधील राजकीय गोंधळानंतर गोव्यातही राजकीय नाट्य सुरु आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दावा केला कि, भाजपाचे आठ आमदार पक्षाला सोठचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, सरदेसाई यांनी हा गौप्यस्फोट अश्या वेळी केला आहे, जेव्हा गोवा फॉरवर्डचे दोन आमदार भाजपात जाणार असे वृत्त समोर आले होते. ते पुढे म्हणाले कि, नवीन राजकीय परिस्थिती पाहता पक्षांतर करून भाजपात गेलेले 12 आमदार अपात्रतेच्या कचाट्यात अडकले आहेत. अश्या परिस्थितीत भाजपा बुडणारे तारू आहे, हे सर्वांनाच माहितेय, त्यामुळे त्या बुडणाऱ्या तारूत उडी घेऊन कोण आत्महत्या करेल, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

माहितीनुसार, जयेश साळगावकर व विनोद पालयेकर हे गोवा फॉरवर्डचे दोन आमदार भाजपात येणार होते. यावर मंत्री मायकल लोबो यांनी म्हंटले होते कि, भाजपाने त्यांना प्रवेश देऊ नये, असे त्यांनी पक्षाला सांगितले. यावर बोलताना सरदेसाई म्हणाले, लोबो यांना मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांनी काँग्रेसमधील 10 जणांना फोडले. मात्र, त्याचे परिणाम त्यांना स्वतःच्याच मतदारसंघात भोगावे लागत आहे. त्यामुळे आपण यात नाही हे सांगण्यासाठी लोबोनी असे म्हंटले. जर भाजपाला आपले दोन आमदार हवे असते. तर त्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळातून हाकलून का लावले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोबो यांना मंत्री बनविण्यासाठी मी माझ्या पक्षातील या मंत्र्यांना काढून टाकावे असा दबाव माझ्यावर टाकला जात होता. पण त्या दबावाला आम्ही भीक घातली नाही, आणि त्यामुळेच आम्हाला मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते, असा मुद्दा त्यांनीं अप्रत्यक्षरीत्या उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, या सरकारचे आरोग्य राजकीय, सामाजिक आणि आर्थिक, अशा तिन्ही बाजूने डळमळीत झाले आहे. त्यात 12 आमदार अपात्रतेच्या कचाट्यात अडकल्याने त्यांचे राजकीय आरोग्य धोक्यात आहे. त्याचबरोबर राज्यात कोरोनाची स्थिती योग्यरीत्या सांभाळता न आल्याने संक्रमितांचा आकडा शून्यवरून 800 वर पोहोचला. ज्यामुळे सामाजिक आरोग्यही धोक्यात आले आहे आणि आर्थिक स्थितीही ढासळल्याने विकासकामे 2021 पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. या सर्वामुळे भाजपात अस्वस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यामुळे त्यांच्याच पक्षातील 8 आमदार फुटू पाहत आहेत . एका आमदाराने तर आपण निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे . अशी गोंधळाची परिस्थिती भाजपाची असल्याने दुसऱ्या पक्षातील आमदार फुटणार, असल्याचे सांगत आहे, असे सरदेसाई म्हणाले.