पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन व त्यांच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयांकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या आठ रुग्णालयांतर्गत केलेल्या आठ पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. फिल्डवर असलेले अधिकारी, कामगार यांना सुरक्षा साधने पुरवली जात असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी अशा 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत काम करणाऱ्या कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीला पोलीस दलातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर नर्स व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. या दोन्ही नर्स पुण्यातील रुग्णालयात कार्यरत होत्या. तर पोलीस कर्मचारी पुणे पोलीस दलात कार्यरत असून पिंपरी चिंवडमध्ये वास्तव्यास आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत वायसीएममधील एका डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर भोसरी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या वॉर्डबॉयला संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. मंगळवारी महापालिका सेवेतील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. पालिकेत वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. निगडी परिसरात पालिका कर्मचारी निवासस्थान असलेली इमारत कालपासून सील करण्यात आली आहे. हा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.