’43 वर्ष राजकारणात एखाद्या राजकुमारी सारखी राहिले’ ! माजी केंद्रीय राज्यमंंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजकीय संन्यास

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  43 वर्षे राजकारणात होते. एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. 400 रुपयांची साडी चार हजाराच्या थाटात नेसली. मन लावून काम केलं. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत. अशा अनोळखी प्रांतात मनस्वी रमता येत नाही. म्हणून मी माझा राजकीय प्रवास आता थांबवत आहे, अशी भावूक पोस्ट लिहून माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपच्या नेत्या सूर्यंकांता पाटील यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. राजकारण सोडले तरी समाजकारण करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सूर्यकांता पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. भली मोठी राजकीय कारकिर्द असलेल्या पाटील यांचं भाजपमध्ये मन न रमल्याने अखेर त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय फेसबूकवरून जाहीर केला. गेल्या 43 वर्षात मला सर्वांनीच सन्मान दिला. अनेक पदे मिळाली. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. आता मला काहीही मिळवायचे नाही. एकटीने सगळं जिंकलंय. लोकांना कंटाळा यावा इतपर्य़ंत प्रवास करण्याची माझी इच्छा नाही. पण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. तरीही माझा निस्वार्थी प्रवास मला फार समृद्ध करून गेला. त्यामुळे मी माझा राजकीय प्रवास थांबवित आहे., असं सांगतानाच राजकीय प्रवास थांबवला तरी नव्या पिढीसाठी काम करत राहणारच आहे. घरी बसणार नाही, असं पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1289049537963866&id=100005764961448

पाटील यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. चार वेळा खासदार, एकदा आमदार आणि केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री, संसदीय कार्य राज्यमंत्री आदी विविध पदे त्यांनी भूषिविले आहे. 1980 मध्ये हदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पाटील या 1986 मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर तीन वेळा त्यांनी हिंगोली-नांदेड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वही केलं आहे.