पहिल्याच दिवशी ‘Fastag’ चा फज्जा, राज्यभरात टोलनाक्यांवर लांबच लांब रांगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्वच टोल नाक्यांवर फास्ट टॅग आजपासून बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, बहुताश वाहनधारकांनी फास्ट टॅग स्टीकर काढून घेतले नसल्याने राज्यातील बहुतांश टोलनाक्यांवर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असून पहिल्याच दिवशी फास्ट टॅगचा फज्जा उडाल्याचे चित्र राज्यातील टोलनाक्यांवर दिसून येत आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यातील टोलनाक्यांवर लांबच लांब रांगा सकाळपासून दिसून येत आहे.

कोल्हापूर येथील कोगनोळी टोल नाक्यावर रोखीने टोल भरण्यासाठी दोन बुथ ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही बुथवर सुमारे ७०० मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनचालकांना नेमके कोणत्या बुथवर जायचे हे समजत नाही. त्यामुळे अलीकडेच वाहने हळू करुन वाहनचालक कोणत्या बुथवर जायचे याची विचारणा करत असून काही मुले त्यांना मार्गदर्शन करताना दिसतात.

रोखीने टोल भरणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापनाने अनेक ठिकाणी हँड मशिन्स उपलब्ध करुन दिले आहेत. या मशिन्सद्वारे काही कर्मचारी रांगेतच टोल स्वीकारुन वाहनचालकांना पावती देत होते.

टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन करण्यासाठी बसविण्यात आलेले कॅमेरे इंटरनेटशी जोडण्यात आले आहेत. वाहनावरील फास्ट टॅग स्कॅन केल्यानंतर खात्यातून आपोआप पैसे जातात. पण नेटवर्क नसल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होतात. ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने फास्ट टॅग असूनही वाहनचालकांकडून रोखीने टोलचे पैसे घ्यावे लागत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/