सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण यांच्यावर FIR दाखल, दुसरीही मुलगी झाल्याने छळ केल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिला अत्याचारासंदर्भात राज्यात कोठेही काही घटना घडल्यावर त्याचा निषेध करण्यासाठी सर्वात पुढे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावरच सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुसरीही मुलगी झाल्याने आपला छळ केला जात असल्याचे त्यांच्या सुनेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबद्दल विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, आनंद आणि शीतल आनंद चव्हाण या चौघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित चव्हाण यांच्या पत्नीने विर्लेपार्ले पोलिसांकडे १६ जानेवारी रोजी तक्रार अर्ज दिला होता.

मात्र, त्यावर आजवर चौकशी झाली नव्हती. विद्या चव्हाण यांच्या सुनेला पहिली मुलगी आहे. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मात्र मुदतीआधीच प्रसुती झाल्याने बाळ दगावले. त्यानंतर आपल्या छळात वाढ झाली असल्याचे सुनेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. महिला अत्याचारासंदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी विद्या चव्हाण या सातत्याने पुढे असतात. वृत्तवाहिन्यांच्या चर्चेतही त्या सहभागी असतात. असे असताना त्यांच्याच घरात मुलगा हवा या हट्टापायी सुनेचा छळ होत असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या गुन्ह्याबाबत पोलीस अधिकारी अधिक बोलण्यास तयार नाहीत.