कोरोनिल : बाबा रामदेव, बालकृष्ण यांच्यासह 5 जणांवर FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचे औषध लाँच झाल्यापासून बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बाबा रामदेव आणि इतर 4 जणांवर राजस्थानची राजधानी जयपूर येथे कोरोनिल औषध संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण कोरोना विषाणूचे औषध म्हणून कोरोनिल या औषधाच्या भ्रामक प्रचारासाठी नोंदविण्यात आले आहे. कोरोनाचे औषध म्हणून कोरोनिल बद्दल भ्रामक प्रचार केल्याच्या आरोपाखाली जयपूरमध्ये ज्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात रामदेव आणि पतंजलीचे बालकृष्ण यांची नावे आहेत. शुक्रवारी जयपूरमधील ज्योतिनगर पोलिस स्टेशनमध्ये ही एफआयआर दाखल करण्यात आली होती. एफआयआरमध्ये योगगुरु रामदेव बाबा आणि बालकृष्ण यांच्याव्यतिरिक्त वैज्ञानिक अनुराग वार्ष्णेय, निम्सचे अध्यक्ष डॉ. बलबीर सिंह तोमर आणि संचालक डॉ. अनुराग तोमर यांच्यावर आरोप केले गेले आहेत.

ज्योतिनगरचे पोलिस स्टेशन प्रभारी (SHO) सुधीर कुमार उपाध्याय यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘बाबा रामदेव, बालकृष्ण, डॉ. बलबीर सिंह तोमर, डॉ. अनुराग तोमर आणि अनुराग वार्ष्णेय यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोरोनिल औषधाच्या दिशाभूल करणार्‍या प्रसिद्धीप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे.’ तक्रार नोंदवणारे वकील बलराम जाखड़ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘बाबा रामदेव यांच्यासह पाच जणांवर कोरोनिलचा दिशाभूल करणार्‍या प्रचाराच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.’ आयपीसीच्या कलम 420 यासह विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

पतंजलीने निम्स जयपूरमध्ये कोरोनिल औषधाची चाचणी केल्याचा दावा केला होता. निम्सचे अध्यक्ष आणि कुलपती डॉ. बीएस तोमर यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘आमच्याकडे रूग्णांची तपासणी करण्यासाठी सर्व आवश्यक परवानगी होती. चाचणीपूर्वी आयसीएमआरची संस्था सीटीआरआय कडून परवानगी घेण्यात आली. आमच्याकडे त्यासंबंधित कागदपत्रे देखील आहेत.’ त्यांनी सांगितले की, ‘निम्स, जयपुर मध्ये 100 रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली होती. परिणामानुसार 3 दिवसात 69% रुग्ण बरे झाले होते. 7 दिवसात 100% रुग्ण बरे झाले.’ कोरोनिल या औषधाची रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून जाहिरात केली पाहिजे. ते म्हणाले की या संदर्भात आम्ही 2 जून रोजी राजस्थान सरकारच्या आरोग्य विभागाला कळविले होते.