महाराष्ट्रात प्रचंड खळबळ ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला धडाकेबाज ‘लेडी’ सहायक पोलिस निरीक्षकावर ‘गोळीबार’

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वसई युनिटच्या सहायक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर गोळीबार झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला़ सुदैवाने त्या बचावल्या. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जायभाये या खासगी मोटारीने शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जात होत्या.

त्याच दरम्यान अहमदाबाद मुंबई महामार्गावरील विरारजवळील बर्गर किंग हॉटेलमध्ये त्या बर्गर घेण्यासाठी उतरल्या. त्यावेळी तोंडावर मास्क लावून मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोराने त्यांच्या दिशेने एक राऊंड फायर केला. तो दुसरा राऊंड फायर करणार त्यातच त्यांच्याबरोबर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याने हल्लेखोराच्या दिशेने दगड उचलून मारला असता तो मुंबईच्या दिशेने पळून गेला.

ही माहिती कळताच पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करुन हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो हाताशी लागू शकला नाही. सिद्धवा जायभाये या धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून पालघर मध्ये प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांच्यावर हल्ला करण्याचे कारण काय ? त्यांना मारण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला की केवळ त्यांना कोणी इशारा देण्यासाठी हे कृत्य केले असा प्रश्न उपस्थित झाला आहे.