अकोल्यात राज्यातील उष्माघाताचा पहिला बळी, 40 वर्षीय प्रौढाचा मृत्यू

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरडे हवामान आणि मध्य भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्यानं उन्हाच्या झळा आणि तीव्र उकाडा जाणवत आहे. विदर्भातील अनेक ठिकाणाचे तापमान ४७ अंश सेल्सियसच्या पुढं गेलं आहे. अशातच बुधवारी अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना समोर आली आहे.

किसन कीनेकर असं या मृत व्यक्तीच नाव असून, ते बाळापूर तालुक्यातील मोरगाव सादीजन येथील (४० वर्षीय) रहिवाशी आहेत. राज्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी असावा, असं जाणकारांचे मत आहे. एकीकडं जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले असताना. दुसरीकडे तापमानाचा पारा ही वाढतो आहे. जिल्ह्यातील तापमान गत दोन दिवसांपासून ४७ अंशावर पोहचलं आहे. त्यावेळीच बुधवारी सर्वोपचार रुग्णालयात उष्माघाताचा पहिला रुग्ण दाखल झाला होता. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.