5 महिने झाले, आणीबाणीतील सत्याग्रहींना सन्मान धन मिळेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य सरकारकडून आणीबाणीतील सत्याग्रहींना गेल्या पाच महिन्यांपासून मासिक सन्मान धन मिळाले नाही अशी तक्रार माजी महापौर दत्ता एकबोटे यांनी केली आहे.

आणीबाणी विरोधात सत्याग्रह करुन कारावास सोसलेल्यांना मासिक दहा हजार रुपये सन्मान धन भाजप युती सरकारने सुरु केले. राज्यभरातून पाच हजार सत्याग्रही या सन्मान धनासाठी पात्र ठरले. त्या सर्वांना हे सन्मान धन मिळणे सुरूही झाले. याकरिता खासदार गिरीश बापट आणि माजी महापौर दत्ता एकबोटे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. जानेवारी २०२० पर्यंत सत्याग्रहींच्या खात्यात हे सन्मान धन जमा झाले. मात्र, त्यानंतर त्यात खंड पडला आहे. याविषयी तहसीलदार कार्यालयात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, चौकशीसाठी फोन केले असता ते फोनही स्वीकारले जात नाहीत. अर्थ खात्याकडून काही तांत्रिक बाबी पूर्ण व्हायच्या असल्याने सध्या सन्मान धन देता येत नाही आशी मोघम उत्तरे मिळतात असे एकबोटे यांनी सांगितले.

आणीबाणी विरोधातील सत्याग्रही आज साठ वर्षांच्या पुढच्या वयाचे आहेत. सध्याच्या काळात त्यांना या सन्मान धनाची अतिशय आवश्यकता आहे. अनेक वर्षे पाठपुरावा करुन हे सन्मान धन सुरु करण्यात आले. ते अचानक थांबवले का गेले याचा खुलासा सरकारने करावा आणि सन्मान धन सुरु करावे अशी मागणी एकबोटे यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like