…म्हणून ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ राज्यातील सरकार पडू देत नाही, माजी मंत्र्याचा अंदाज

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –    राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचं देणंघेणं नाही. केंद्र सरकार विविध माध्यमातून शेतकरी, जनता यांना मदत करत आहे. परंत राज्य सरकारनं कुठलीही मदत जनतेला केली नाही असं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. राज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार एवढीच त्यांची व्याख्या आहे अंस म्हणत माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ही समाचार घेतला आहे.

दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरमध्ये शहर भाजपच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलं कळतं की, आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सरकारमध्ये आहोत. त्यामुळं आता केवळ सरकार पडू द्यायचं नाही. सरकार चालवायचं आणि सरकारमध्ये राहायचं असं त्यांचं काम चालू आहे.”

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “लोकांचा विकास, रस्ते, शेतकऱ्यांचे पंचनामे, दुष्काळ अशा प्रश्नांवर सरकार बोलण्यास तयार नाही. या सरकारला अनेक क्षेत्रात अपयश आलं आहे. हे विदारक चित्रक सरकारला भविष्यात खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या गोष्टीसाठी सरकारची नेमणूक झाली त्या दिशेनं त्यांना यश येताना दिसत नाही. त्यांच्याकडून कोणताही निर्णय होत नाही. राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचं देणंघेणं नाही. या सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत.” असंही ते म्हणाले.