नगरमधील 3 मंत्री आहेत कुठं ? जातात कुठे अन् करतात काय ? काहीच समजत नाही

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना सारखे संकट आपल्यावर आले आहे. मात्र, या प्रसंगी जिल्ह्यातील तीन मंत्री महोदय कमी पडतायत असा घणाघाती आरोप माजी आमदार वैभव पिचड यांनी केला आहे. सध्या जिल्ह्यातील तिन्ही मंत्री लोकांच्या अडचणी दूर केल्या असे जाणवत नाही. ते जिल्ह्यामध्ये कुठे जात आहेत ? काय करतात ? हे दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केली.

पिचड हे आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी नगर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना परिस्थिवरुन जिल्ह्यातील तीन मंत्र्यांवर निशाणा साधला. पिचड म्हणाले, राज्य सरकार अस्तित्वात आल्यावर जिल्ह्याला तीन मंत्रीपद मिळाली. मात्र त्यानंतर कोरोनाचे संकट सुरु झाले. या संकटामुळे फिरायला मर्यादा नक्की आल्या असती. पण कमीतकमी ज्या लोकप्रतिनीधींना मंत्रिपद मिळाले, त्यांनी ग्रामीण भागात जायला पाहिजे होते. तेथील आरोग्य यंत्रणेचा विचार करुन लोकांची चौकशी केली पाहिजे. ते सुदैवाने होताना दिसत नाही.

जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना जी मंत्रीपदाची सुवर्णसंधी भेटली, त्या सुवर्णसंधीतून त्यांनी ग्रामीण भागातील माणसाच्या आरोग्याची विचारपूस करण्याची व शासन कुठे कमी पडत नाही, हे दाखवण्याची गरज होती. पण ते होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत शासन कमी पडले, तर त्याचा रोष निश्चितपणे मंत्र्यांवर निघाल्या शिवाय राहणार नाही. जिल्ह्यामध्ये यामागेही अनेक मंत्री होऊन गेले आहे. ते मंत्री फिरत होते, त्यांची चर्चा होत होती. मग ते कोणत्याही पक्षाचे असु द्या. मागील काळातील मंत्री हे जिल्ह्यातील अडचणी सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करताना दिसत होते, मात्र जिल्ह्यावर सध्या कोरोनाचे संट असताना सध्याचे जिल्ह्यातील मंत्री मी पडताना दिसत असल्याचे पिचड यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात फिरण्याची गरज

राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नगरमधील कोरोना परिस्थिती ही काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी बोलताना सांगितले होते. पालकमंत्र्यांच्या या विधानाचा माजी आमदार वैभव पिचड यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यातील नेमका कोणता आकडा पालकमंत्र्यांनी घेतला जो माहिती नाही. मुळात पालकमंत्री महोदय यांचा दौरा संपूर्ण नगर जिल्ह्यात झाला असता तर त्यांना वस्तुस्थिती काय आहे ते समजले असते. सध्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे प्रकार सुरु आहेत. वेळीच यामध्ये लक्ष घातले नाही, तर नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वाढलेला दिसेल, तर मग हे खापर फोडायचे कोणावर हा चिंतेचा विषय असल्याचे पिचड म्हणाले.