राज्यसभा खासदार आणि सपा नेते बेनी प्रसाद वर्मा यांचं निधन

वृत्तसंस्था – राज्यसभेचे खासदार आणि समाजवादी पार्टीचे दिग्गज नेते बेनी प्रसाद वर्मा यांचं शुक्रवारी सायंकाळी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासुन ते आजारी होते. बेनी प्रसाद यांच्या निधनाच्या वृत्तानं समाजवादी पार्टीवर शोककळा पसरली आहे. ते समाजवादी पार्टीचे संस्थापक सदस्य होते.


सन 1996 मध्ये ते दूर संचार विभागाचे स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री होते. त्याच वर्षी त्यांच्याकडे संसदीय कार्य विभागाचं राज्यमंत्री पद सोपविण्यात आलं होतं. 1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा विजय झाला. सन 1998 मध्ये ते उत्तरप्रदेश समाजवादी पार्टीचे प्रमुख सदस्य बनले. त्यापुर्वी ते समाजवादी पार्टीचे सरचिटणीस होते. 1996 ते 1998 दरम्यान देवीगौडा मंत्रिमंडळात केंद्रीय संचार मंत्री पदावर ते कार्यरत होते. त्यानंतर सन 1998 मध्ये ते उत्तरप्रदेश सरकारमध्ये पीडब्ल्यूडी तसेच संसदीय कार्य मंत्री होते. सन 1999 मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी जनता दलामध्ये प्रवेश केला आणि ते प्रमुख बनले. त्याचवेळी ते जनता दलाचे संसदीय बोर्डाचे सदस्य बनले होते.