Coronavirus : 4 राज्यांतील स्थिती गंभीर ! मुंबई, पुण्यात केंद्राची पथकं दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या नियमांचे काही राज्यात उल्लंघन होत असून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच काही राज्यांमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये रुग्ण वाढत असल्याने त्या राज्यांच्या सहकार्यासाठी केंद्राने पथकं पाठवली आहेत. ही पथकं राज्यांना उपययोजना आणि सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात मार्गदर्शन करतील, असे केंद्रीय गृमंत्रालयाने स्पष्ट केलं. यानुसार महाराष्ट्रातही केंद्राचं पथक दाखल झालं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, अनेक राज्यात या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रारी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने मंत्रिगटाची स्थापना केली आहे. सहा मंत्रिगट असून हे पथक देशातील चार राज्यातील महत्त्वाच्या शहरात भेट देणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात केंद्राचे हे पथक भेट देणार आहे.
महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथील परिस्थिती गंभीर असल्याचे निरिक्षण केंद्र सरकारने नोंदवले आहे. त्यामुळे राज्यात या शहरांना पथक भेट देणार आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊन दरम्यान दिलेल्या नियमांचे उल्लंघन राज्यात झाल्याच्या तक्रारीचा आढावा हे पथक घेणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा मिळत आहेत की नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत आहे का ? आरोग्याच्या योग्य सोयी-सुविधा आहेत का ? आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांची परिस्थिती आणि राज्यात मजूर आणि गरिबांसाठी काय व्यवस्था केली याचा आढावा हे केंद्रीय पथक घेणार आहे.

महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रेदशातील इंदोर, राजस्थानमधील जयपूर तर पश्चिम बंगालमध्ये कोलकता, दार्जिलिंग, जलपैगुडी, हावडा अशा शहरात हे केंद्रीय पथक जाणार आहे. विशेष म्हणजे या चार राज्यापैकी फक्त मध्य प्रदेश मध्येच भाजप शासित राज्य सरकार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून लॉकडाऊनवर सतत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून जिथेही नियमांचे उल्लंघन होत आहे तिथे योग्य ती कारवाई केली जात आहे.

गृहमंत्रालयाने काल राज्यांना पुन्हा एक पत्र लिहले आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जे दिशानिर्देश जारी केले आहेत त्या दिशानिर्देशांचे राज्य सरकारांना सक्तीने पालन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार राज्य सरकारं अधिक सक्तीने नियमांचे पालन करू शकतात. पण राज्यांनी नियमांचे पालन करताना कुचराई करू नये. सर्व राज्यांनी आणि सार्वजनिक सेवेतील यंत्रणांनी आणि नागरिकांनी भारत सरकारने दिलेल्या आदेशाचे आणि नियमांचे देशाच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे पालन करावे, असं सुप्रीम कोर्टाने 31 मार्चला दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. याची आठवण राज्यांना पत्रातून करून देण्यात आली आहे, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलंय.

मुंबईतील पथकात कोण असणार ?
अतिरिक्त सचिव, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय मनोज जोशी, डॉ. एस.डी. खापर्डे, नागेश कुमार सिंग, अभय कुमार, अनुराग राणा अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पुण्यातील पथकात कोण असणार ?
संजय मल्होत्रा, डॉ. पी.के. सेन, डॉ. पवन कुमार सिंग, डॉ. अविनाश गवई, करमवीर सिंग हे अधिकारी पुण्याच्या पथकामध्ये असणार आहेत.