जादा परताव्याच्या अमिषाने कोट्यवधींची फसवणूक

शिवतारा प्रॉपर्टीज प्रा. लिमी. च्या संचालक व पत्नीविरोधात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एका वर्षात गुंतवणूक केलेल्या रकमेवर ५० टक्के फायदा मिळवून देण्याचे अमिष दाखवून व केलेल्या कामाचे असे मिळून स्थापत्य अभियंता दाम्पत्याला ४ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रॉपर्टीज प्रा.लिमी. कंपनीचे संचालक व त्यांच्या पत्नीवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ३५ वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला येरवडा येथील एका कंपनीत टेक्नीकल आर्किटेक्ट म्हणून नोकरी करतात. त्यांचे पती यांची बावधान येथे इंजस्ट्रीज कंपनी असून ते सिव्हील कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही काम करतात. दरम्यान शिवतारा प्रॉपर्टीज प्रा. लिमीटेडच्या कॅनोट प्लेस येथील कार्यालयात त्यांची कंपनीच्या संचालक व त्यांच्या पत्नीशी भेट झाली. त्यांनी दाम्पत्याला कंपनीत गुंतवणूक केल्यास ५० टक्के जादा परतावा देण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे गुंतवले. तसेच त्यांच्या कंपनीची वेगवेगळी कामेही करून दिली. परंतु त्या कामाचे पैसे परत दिले नाहीत. तसेच जादा परताव्याच्या अमिषाने गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्याचा परतावाही दिला नाही. पैसे परत मागितल्यानंतर मात्र टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपली एकूण ४ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे करत आहेत.