शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात ‘फ्री स्टाइल’ हाणामारी पडली महागात, वरिष्ठांकडून ‘त्या’ महिला कर्मचार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात त्या दोन महिला कर्मचाऱ्यांची “फ्री स्टाईल” हाणामारी त्यांच्या वरिष्ठांना चांगलीच महागात पडली आहे. अतिवरिष्ठांनी कंपनी डिओंच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यामुळे पोलीस दलात चर्चेला उधाण आले असून, चूक एकाची अन शिक्षा सर्वानाच असे बोलले जाऊ लागले आहे.

पोलीस मुख्यालयात ड्युटी ऑफिसर मदतनीस पोलीस शिपाई महिला व पोलीस नाईक महिलेचे वाद झाले होते. वादानंतर हे प्रकरण थेट मारहाणीवर गेले होते. घटनेमुळे खळबळ उडाली होती. मारहाणीत दीपाली जाधव असे हाणामारीत जखमी झालेल्या पोलीस नाईक महिलेचे नाव आहे. सना शेख असे मारहाण करणाऱ्या महिला शिपायाचे नाव आहे. या मारहाणीची वरिष्ठ पातळीवरुन याची माहिती घेण्यात आली. यानंतर डिओ कंपनीची उचलबांगडी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ड्युटीसंदर्भात दोघींत शाब्दिक वादावादीतून शिवीगाळ व मारहाणीची घटना घडली होती. पण यात थेट कंपनीच्या डिओंवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. कंपनीच्या डिओंचा कालावधी सहा महिन्यांपेक्षा जास्त झाल्याचे कारण देत बदली करण्यात आली आहे.