पुण्यात 11 वी च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, ‘मार्कशीट’ शिवाय इतर कागदपत्रांची नाही ‘सक्ती’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी 26 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी केली आहे. आता प्रवेश अर्जातील एक भाग भरण्याची सुविधा आज म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. पुण्यात देखील आजपासून 11 वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड यासह इतर मनपा क्षेत्रात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी गुणपत्रिकेद्वेरे फॉर्म भरता येणार आहे. प्रवेश घेण्यासाठी इतर कोणत्याही कागदपत्रांची सक्ती करण्यात आलेली नाही. प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरता येणार आहे.

शुल्क भरून फॉर्म ब्लॉक करणे आवश्यक आहेत. तसेच अर्जातील माहिती शाळा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करुन घेणे. विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग एक ऑनलाईन तपासून प्रमाणित व्हेरिफाईड करून घ्यावा. यावेळी विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिकेद्वारे 11 वीचा प्रवेश अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी इतर कागदपत्रांची सक्ती नाही. पण ज्या विद्यार्थ्यांकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर ते अपलोड करु शकतात.

दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, बदली आदेश आदी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांना अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक आहे. 11 वी प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे विद्यार्थी तांत्रिक कारणामुळे सादर करु शकला नाही. तर त्या विद्यार्थ्याकडून हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. ही कागदपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्याला तीन महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे.

कोरोनामुळे मागील चार ते पाच महिन्यांपासून राज्यात टाळेबंद परिस्थिती असून शासकीय कार्यालये अद्याप पूर्ववत सुरु झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट मिळवताना अडचणी येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी यावेळी प्रवेश घेताना कागदपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. विद्यार्थी दहावीच्या गुणपत्रीकेवरून अकरावीला प्रवेश घेऊ शकतो, असे प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रवेशाची क्षमता
महाविद्यालये – 304
विज्ञान शाखा – 43 हजार 981
कला शाखा – 15 हजार 581
वाणिज्य शाखा – 42 हजार 755
एमसीव्हीसी – 4 हजार 495