निफाड पंचायत समितीच्या ‘लेटलतीफ’ कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी करत स्वागत

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेेेश बोरा) – निफाड पंचायत समितीच्या 95 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 31 कर्मचारी वेळेवर कामावर हजर नसल्याने पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुराशे यांनी गांधीगिरी करत या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याची कारवाई करण्यात आली असल्याने लेटलतीफ कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

निफाड पंचायत समिती मध्ये अनेक कर्मचारी उशिराने दाखल होतात, तर अनेक कर्मचारी हे नागरिकांची कामे करण्यास टाळाटाळ करतात. तसेच विविध प्रकारच्या तक्रारी कर्मचार्‍यांच्या बाबतीत पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचनाही करण्यात आलेल्या होत्या.

सप्ताह च्या पहिल्याच दिवशी सोमवारी पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे व सदस्य हे 9.45 वाजेच्या दरम्यान कार्यालयात उपस्थित होते. यावेळी सुमारे 95 कर्मचारी संख्या असलेल्या निफाड पंचायत समितीच्या कार्यालयातील तब्बल 31 कर्मचारी हे उशिराने कामावर दाखल झाले. सामान्य प्रशासन विभागातील 3 कर्मचारी, बांधकाम विभागातील 8 कर्मचारी, आरोग्य विभागातील 3 कर्मचारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पचे 15 कर्मचारी, शिक्षण व लघु पाटबंधारे विभागाचे प्रत्येकी एक कर्मचारी यांचा यात समावेश आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने उपसभापती शिवा सुरासे यांनी सत्कार केला व यांच्या एक दिवस पगार कपातीची कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांना दिल्या असून उद्यापासून सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सूचनेचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

यानंतर कठोर कारवाई –

गेल्या सप्ताहात शुक्रवारी मोठ्या संख्येने कर्मचारी पंचायत समितीत गैरहजर होते. अनेक कर्मचारी मनमौजी वागतात अशा नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. आज एक दिवस पगाराची कपात करण्याची कारवाई करण्यात आलेली असली तरी भविष्यात लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. असे निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा पाटील सुराशे यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –