खडसेंच्या राष्ट्रवादीतील एन्ट्रीनंतर गिरीश महाजन झाले सक्रिय, रक्षा खडसेंच्या अनुउपस्थितीबाबत दिली पहिली प्रतिक्रिया

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीस खासदार रक्षा खडसे अनुपस्थित राहिल्याने राजकीय क्षेत्रात अनेक तर्क वितर्क काढण्यात येत होते. त्यावर आता गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

गिरीश महाजन म्हणाले, “रक्षा खडसे काल रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्याबाबत त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्व कल्पना दिली होती. पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला रवाना झाल्या आहेत. म्हणून त्यांच्या अनुपस्थिती बाबत तर्कवितर्क काढणे चुकीचे आहे.”

भाजपा व्यक्तिक्रेंद्री पक्ष नाही

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपास मोठा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासंदर्भात विचारले असता गिरीश महाजन यांनी सांगितलं की, भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष असून, तो व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. म्हणून पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो. एकनाथ खडसे गेल्याने भाजपला कसलाही फटका बसणार नाही. त्याउलट येणाऱ्या काळात पक्षसंघटन मजबूत करण्याबद्दल चाचपणी सुरु असल्याचे त्यांनी म्हटलं.

मराठा आरक्षणाबाबत सरकारला गांभीर्य नाही

मराठा आरक्षणाच्या विषयावरती बोलताना महाजन म्हणाले, राज्य सरकारला या प्रकरणी कसलेही गांभीर्य नाही. सरकारच्या आरक्षणाबद्दल बैठका सुरु आहेत, विचारविनिमय सुद्धा होत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारच्या ठोस निर्णयापर्यंत सरकार पोहोचत नाही. म्हणून या विषयी दिरंगाई होत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही विशेष समिती स्थापन केली होती. पाच सदस्यांच्या समितीने अभ्यासपूर्ण नियोजन केले होते. पण दुर्दैवाने आमचे सरकार गेले. उच्च न्यायालयात आम्ही आरक्षण टिकवले. परंतु, सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेला. त्याठिकाणी आरक्षणाला स्थगिती मिळाली. तीन पायाच्या शर्यतीसारख्या चालणाऱ्या सरकारच्या वेळ काढू पणामुळे या विषयाचा खेळखंडोबा झाल्याची टीका महाजन यांनी केली.