आगमी 2 महिन्यामध्ये 2 कोटी 70 लाख ‘मास्क’ अन् 50000 ‘व्हेंटिलेटर’ची गरज पडणार, केंद्र सरकारचा अंदाज

नवी दिलली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच COVID19 महामारी विरुद्ध पुकारलेल्या लढाईत केंद्र सरकारने वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) आणि डायग्नॉस्टिक किटच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचे म्हणणे आहे की येत्या 2 महिन्यांत सुमारे 2 कोटी 70 लाख एन -95 मास्क , 1 कोटी 50 लाख पीपीई, 16 लाख डायग्नॉस्टिक किट आणि 50 हजार व्हेंटिलेटरची आवश्यकता भासेल.

कशाची मागणी वाढणार ?

FICCI च्या प्रतिनिधींनी देखील या बैठकीमध्ये भाग घेतला होता. असे सांगण्यात आले आहे की, जून 2020 पर्यंत 27 मिलियन म्हणजेच 2 कोटी 70 लाख N-95 मास्क, 1.6 मिलियन म्हणजेच 16 लाख टेस्ट किट आणि 15 मिलियन म्हणजेच 1 कोटी 50 लाख पीपीई ची गरज भासणार असा अंदाज आहे. याशिवाय जूनपर्यंत 50 हजार व्हेंटिलेटरची मागणी केली जात आहे. यापैकी 16,000 व्हेंटिलेटर आधीच अस्तित्वात आहेत आणि 34,000 व्हेंटिलेटरसाठी ऑर्डर देण्यात आल्या आहेत. अधिकारी म्हणाले की विदेश मंत्रालयाने परदेशातून व्हेंटिलेटर आणि इतर पीपीई खरेदी करण्याबाबत दखल घेतली आहे.

अमिताभ कांत यांच्याशिवाय प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजयराघवन, एनडीएमए सदस्य कमल किशोर, सीबीआयसी सदस्य संदीप मोहन भटनागर, अतिरिक्त सचिव (गृह) अनिल मलिक, पीएमओचे सहसचिव गोपाल बागले, आणि कॅबिनेट सचिवालयाचे उपसचिव टीना सोनी हेही या बैठकीस उपस्थित होते.

वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर सरकारकडून लगाम

अहवालानुसार गंभीर वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्यास वेग देण्यासाठी सरकार झटत आहे आणि गेल्या काही आठवड्यांत त्यांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी टेस्ट किटच्या निर्यातीवर बंदी घालणे हे या प्रकरणातील ताजे पाऊल आहे. २4 मार्च रोजी सरकारने “कोणत्याही प्रकारचे कृत्रिम श्वसन यंत्रणा किंवा ऑक्सिजन थेरपी उपकरणे किंवा इतर श्वासोच्छवासाच्या उपकरणांसह” सर्व प्रकारच्या व्हेंटिलेटर आणि सेनिटायझर्सच्या निर्यातीवर बंदी घातली.