दोन्ही हातानं AK-47 चालवणार्‍या अन् बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिला अटकेत

पटना : वृत्तसंस्था – बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी आणि दोन्ही हातांनी रायफल आणि एके ४७ चालवणाऱ्या महिलेस पोलिसांनी तिच्या लग्नाच्या मंडपातून अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील जंगलात नक्षलवादी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या पुष्पा उर्फ गौरी हिला सीआरपीएफ आणि कोबरा बटालियनने लग्नाच्या मंडपातून अटक केली. औरंगाबाद जिल्ह्यात घडलेल्या ७ ते ८ घटनांमध्ये या महिलेवरती नक्षलवादी असल्याचा ठपका आहे. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर गावात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सीपीआय माओवाद्यांच्या सक्रिय पथकाची सदस्या असलेली पुष्पा उर्फ गौरी ही मदनपूर पोलिस ठाण्यानंतर्गत येणाऱ्या लंगुरही गावाची रहिवाशी असून, ती गावच्या रामसुचीत सिंग भोक्ताची मुलगी आहे. पुष्पा उर्फ गौरी हिला सीआरपीएफच्या पथकाने लग्नाच्या मंडपातून अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी महिला नक्षलवाद्याचे लग्न होणार होते. लग्नाबाबत सुरक्षा दलाला माहिती मिळताच तिला अटक करण्याकरिता आराखडा तयार करण्यात आला. कृती आराखड्याचा भाग म्हणून लंगुरही गावाजवळील जंगलात मोर्चा काढणाऱ्या एका महिला नक्षलवादीच्या घरावर सुरक्षा दलांनी छापा टाकला. विवाह करण्यापूर्वीच तिला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं.