Methi For Diabetes : ‘ब्लड शुगर’ कंट्रोल करण्यासाठी खावी ‘मेथी’ची भाजी, होतील ‘हे’ फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पालक, मेथी, चाकवतसारख्या ताज्या पालेभाज्या हिवाळ्याच्या काळात बाजारात दिसू लागतात. या हिरव्या पालेभाज्या खायला तर स्वादिष्ट असतातच, परंतु शरीराला अनेक प्रकारे फायदेशीरदेखील ठरतात. असाच एक आजार म्हणजे डायबिटीस, ज्याबद्दल आपण आज जाणून घेऊया.

डायबिटीस हा एक गंभीर आजार आहे. ज्यांचा आहार आणि जीवनशैली ठीक नसते अशा लोकांना डायबिटीसचा धोका अधिक असतो. दीर्घकाळ असंतुलित आयुष्य जगण्यामुळे डायबिटीसचा धोका वाढतो. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला त्याच्या शुगर लेव्हलची सातत्याने तपासणी करून त्यास नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना एक विशेष आहार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत डायबिटीसचे रुग्ण त्यांच्या आहारात मेथीच्या हिरव्या भाजीचा समावेश नक्कीच करू शकतात.

मेथीमध्ये डायबिटीसविरोधी घटक

मेथी अनेक रोग बरे करण्यास उपयुक्त असते. मेथीला आयुर्वेदात औषधाचा दर्जाही देण्यात आला आहे. मेथीमध्ये हायड्रॉक्सिसिल्यूसीन नावाचा एक अमिनो अ‍ॅसिड असतो, जो एक प्रकारचा डायबिटीस विरोधी घटक आहे. याव्यतिरिक्त, त्यात उपस्थित ग्लॅक्टोमॅनन पचन दर नियंत्रित करतो, जेणेकरून शरीरातील कार्ब्स त्वरित ब्रेकडाउन होत नाही आणि ब्लड शुगर लेव्हलदेखील नियंत्रणाखाली राहते.

मेथी विविध रोग बरे करण्यात प्रभावी

डायबिटीसच्या व्यतिरिक्त कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग्यांनादेखील मेथी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच मेथीमध्ये उपस्थित अँटि-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे अपचन आणि अ‍ॅसिडिटी कमी करण्यातदेखील उपयुक्त ठरतात. तसेच मेथी कोलेस्ट्रॉलला संतुलित ठेवते. त्याच वेळी मेथीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे संधिवात असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतात. यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी होते.

मेथी कशी खावी

मेथीची पाने फायबरने समृद्ध असतात, जी शरीरातील पचन प्रक्रिया हळुवार करतात. ज्यामुळे शुगरचे अब्जॉर्प्शन लवकर होत नाही. तसेच मेथीच्या सेवनामुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाणदेखील वाढते. लोक मेथीचे पराठे, धपाटे, वडा, ओट्स किंवा भाजी बनवून खाऊ शकतात. तथापि, आरोग्य तज्ज्ञांच्या मते रुग्णांनी दररोज एक मूठभर मेथीच्या पानांपेक्षा जास्त मेथीचे सेवन करू नये.