पालघर हत्याकाडांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अकोला :  पोलीसनामा ऑनलाइन  –  दरोडेखोर असल्याच्या संशयावरून सुरतकडे निघालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाची पालघर येथे जमावाकडून हत्या झाल्यांनतर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यांनतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ” पालघर येथे घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेमध्ये केले.

गुरुवारी रात्री पालघर येथील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिकवरून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होत. या गाडीत बसलेल्या तिघांची त्यांनी विचारपूर केली. पण त्यांनी काही सांगायच्या आत ग्रामस्थांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तर इतर ग्रामस्थांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जमावाने पोलिसांनाही दाद दिली नाही. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे.

१०१ जणांना पोलीस कोठडी तर ९ जणांची रवानगी बालसुधागृहात

गडचिंचले येथे तीन जणांची हत्या केल्या प्रकरणी ११० आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील ९ आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठविले आहे. तर अन्य १०१ आरोपींना शनिवारी १८ एप्रिल रोजी डहाणू कोर्टात हजर केले असता त्यांना ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर काही आरोपी अद्याप फरार असून कासा पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय

गडचिंचले येथे जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाले असून राज्य राखीव दलाच्या तुकडीसह दीडशे ते दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र पोलिसानं समोर साधूंची हत्या झाल्याने पोलिसांच्या भूमिकेसंदर्भांत आता प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, या साधूंवर झालेल्या हल्ल्यावेळी तेथील फॉरेस्ट चौकीवरील वनरक्षकाने पोलिसांना या हल्ल्याची माहिती दिली होती. व त्या जखमी साधूंना चौकीत बसवून ठेवले होते. मात्र पोलिसांना हल्ल्याची कल्पना असताना देखील त्यांनी जमावाला तातडीने पांगविले का नाही असा प्रश्न उपस्थित होत असून, पोलिसांच्या समक्ष त्या साधूंना फॉरेस्ट चौकीतून बाहेर काढून जमावाने वयोवृद्ध साधूंवर लाठ्याकाठ्यांसह जबर हल्ला चढवला.

मात्र, त्यावेळी पोलिसांनी कोणताही प्रतिकार न करता फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने तीन जणांची हत्या झाल्याचे समोर येत असल्याने पोलिसांच्या एकूण कामाबद्दल आता आक्षेप घेतला जात आहे.