‘या’ चीनी महिलेनं बिघडवले भारत आणि नेपाळचे संबंध, नकाशा बदलण्याच्या मागे देखील हिचंच डोकं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारताचा शेजारी असलेल्या नेपाळशी संबंध सध्या अत्यंत खराब टप्प्यात आहेत. नेपाळच्या संसदेने देशातील वादग्रस्त राजकीय नकाशाला त्यांच्या भागात समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही देशांच्या लोकांच्या येण्या-जाण्यासाठी नेहमीच खुल्या असणार्‍या सीमेवर सशस्त्र जवान तैनात केले आहेत. नेपाळने आपल्या नवीन नकाशामध्ये भारताच्या लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा यांना आपला भाग सांगितले आहे. असे मानले जात आहे की, यासाठी नेपाळला चीनने भडकवले आहे. यात विशेषतः नेपाळमध्ये चिनी राजदूत होऊ यांगीचे नाव समोर येत आहे, जिने पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना भारताविरुद्ध जाण्यासाठी तयार केले.

सन २०१८ पासून नेपाळमध्ये चिनी राजदूत म्हणून काम करणाऱ्या होऊ यांगीला दक्षिण आशियाचे तज्ञ मानले जात आहे. होऊ यांगीने परराष्ट्र मंत्रालयात दीर्घ काळापासून डेप्युटी डायरेक्टरची भूमिका बजावली आणि अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. तिच्या बऱ्याच निर्णयामुळे चीनचा संबंध शेजारच्या देशांशी प्रभावित झाला. होऊ यांगीने चिनी राजदूत म्हणून तीन वर्षे पाकिस्तानमध्येही घालवली आहेत.

भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, होऊ यांगीने पाकिस्तानात राजदूत म्हणून काम करत असताना पाकिस्तानी सरकारसाठी अनेक धोरणांवर काम केले आहे. यापैकी बरीच धोरणे भारताशी संबंधितही होती. पाकिस्तानमधील तिचे यश पाहून तिला नेपाळला पाठवण्यात आले. प्रथमच भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांमध्ये इतकी कटुता आली आहे.

नेपाळने वादग्रस्त नकाशा जाहीर केल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. नेपाळच्या कारनाम्यामागे यांगीचा हात असल्याचे मानले जात आहे. तिने पंतप्रधान ओली आणि नेपाळच्या संसदेला त्यासाठी तयार केले. माहितीनुसार होऊ यांगी पंतप्रधान ओली यांच्या कार्यालयात आणि त्यांच्या निवासस्थानी येत-जात असते. असेही म्हटले जात आहे की, नेपाळमधील सत्ताधारी पक्षाचे शिष्टमंडळ, ज्याने नकाशामध्ये सुधारणा करण्याचे विधेयक बनवले, यांगी त्यांच्या संपर्कातही होती.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या यांगीच्या मुत्सद्दीपणाचा अंदाज यावरूनच लावता येतो की, तिने पाकिस्तानमध्ये आपला अजेंडा चालवण्यासाठी उर्दू भाषा शिकली. यांगी सोशल मीडियावर चीनच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांबदल वाढवून-चढवून सांगत असते. याला सॉफ्ट पॉवर वाढवणे म्हटले जाते.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील भागात भारतीय आणि चिनी सैनिकांच्या हिंसक चकमकीत २० भारतीय सैनिक ठार झाले होते. दोन्ही देशांमधील वाढत्या संघर्षादरम्यान नेपाळने अशी पावले उचलणे हे मोठ्या षडयंत्रांचे संकेत देत आहे. मात्र आता नेपाळमध्ये केपी शर्मा ओली यांच्या पक्षाने त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. अलीकडेच ओली यांनी म्हटले होते की, भारत त्यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा कट रचत आहे.