पत्नीची हत्या केल्यानंतर थेट पोलिसांकडे गेला चौथा पती, कबुली देत सांगितलं धक्कादायक ‘सत्य’

पाटणा : वृत्तसंस्था – एका महिलेच्या चौथ्या पतीने तिची धारधार कात्रीने हत्या केली आणि तो स्वत:हून पोलीस ठाण्यात गेला. पोलीस ठाण्यात जाऊन त्याने आपण केलेल्या कृत्याची कबुली देत कारणही सांगितले. खुनाची ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण आहे. राजधानी पाटण्यात हत्येची ही घटना घडली असून यामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

पत्नीचा खून करून पोलीस ठाण्यात गेलेल्या पतीकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी गेले असता अजमती खातून हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला. शेजारच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, या महिलेने अनेक विवाह केले आहेत. संजय नावाच्या व्यक्तीशी लग्न केल्यानंतर ती गेली 5 वर्षे ब्रह्मपूर येथे राहत होती. एका पतीने तिला वारंवार मारहाण केली म्हणून तिने जुनैदशी चौथे लग्न केले होते.

पत्नीच्या अवैध संबंधांची माहिती मिळाल्यानंतर पती जुनैद आणि पत्नी अजमती खातून उर्फ पिंकी यांच्यात सतत भांडणे होत होती. जुनैद तिला मारहाणसुद्धा करत होता. घटनेच्या दिवशी दोघांमधील भांडण विकोपाला गेले आणि भांडण सुरू असतानाच पत्नीने पतीवर कात्री फेकून मारली. या हल्ल्यानंतर पतीने तीच कात्री घेऊन तिच्यावर वार केले, यामध्ये ती जागीच ठार झाली. पत्नी अजमती खातून उर्फ पिंकीची हत्या केल्यानंतर पती जुनैद थेट पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नीची हत्या केल्याची त्याने कबुली दिली. मृत महिलेच्या आधीच्या तीन पतींचीदेखील चौकशी करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.