संतापजनक ! कपडयांच्या उंचीचं मोजमाप घेऊनच विद्यार्थीनींना कॉलेजात प्रवेश (व्हिडीओ)

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद येथील सेंट फ्रान्सिस गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या ड्रेस कोडसंदर्भात  अजब नियम जारी केला आहे. या नियमानुसार विद्यार्थिनींनी गुडघ्याच्या खाली लांब कुर्ता किंवा ड्रेस परिधान केल्यासच त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. एवढंच नव्हे तर कॉलेजने विद्यार्थिनींच्या कुर्त्यांचं मोजमाप घेण्यासाठी एक महिला सुरक्षारक्षक देखील नेमली आहे. या नियमाचं विद्यार्थिनींनी कडाकडून विरोध दर्शवला आहे. याविरोधातील पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 लांब कुर्ते/ ड्रेस परिधान केल्यास लग्नासाठी चांगली स्थळं येतील : प्राध्यापकांचा अजब तर्क

विद्यार्थीनींनी या नियमाचा कडाडून विरोध केला आहे. तसेच या नियमाला विरोध दर्शवणाऱ्या पोस्टही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या नव्या ड्रेस कोडविषयी कॉलेजच्या एका माजी विद्यार्थिनीनं नव्या ड्रेस कोडसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीनं सांगितलं की, ‘कॉलेज प्रशासनाकडून मध्य सत्रात नवीन ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे.

लांब कुर्ते/ ड्रेस परिधान केल्यास लग्नासाठी चांगली स्थळं येतील असं प्राध्यापकांचं म्हणणं आहे. याविरोधात आवाज उठवणं योग्य नाही, असंही कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला बजावलं आहे. गुघड्याच्या किंचितसा जरी वर कुर्ता किंवा ड्रेस असेल तर आमचा छळ केला जात आहे. ज्या विद्यार्थीनी या नियमांचं पालन करत नाहीत त्यांना कॉलेजच्या बाहेर उभं राहण्याची शिक्षा दिली जाते. त्यामुळे आमच्या अभ्यासाचं नुकसान होत आहे.’ असा आरोप त्या विद्यार्थीनीने केला आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाही –

1 ऑगस्टपासून सेंट फ्रान्सिस गर्ल्स कॉलेजने हा फतवा जारी केला आहे. यानुसार  विद्यार्थीनींनी गुडघ्याच्या खाली लांब कुर्ता घालणे अनिवार्य आहे. कॉलेजने विद्यार्थिनींच्या कुर्त्यांचं मोजमाप घेण्यासाठी नेमलेली महिला कर्मचारी विद्यार्थिनींचं ओळखपत्र तपासून त्यांच्या कुर्त्यांची उंची मोजण्याचं काम करते. ज्या विद्यार्थिनी या नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला जातो.