‘राष्ट्रवादीत आल्यानं मी टेन्शन फ्री, भाजपामध्ये कधी काय चौकशी लागेल याची भीती होती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मी टेन्शन फ्री झालो आहे,’ असे विधान जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. बुधवारी एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. शुक्रवारी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला. त्यानंतर नाशिकमध्ये वार्ताहरांना संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, राष्ट्रवादीत आल्याने मी टेन्शन फ्री झालो असून, भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती. मी पक्ष सोडू नये म्हणून फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता. नाहीतर कोणालाही माझी गरज नाही. साधा संघटन मंत्र्याचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान भाजप सोडण्याचा विचार केला असता. आता भाजपमध्ये फक्त युझ अँड थ्रोची पद्धत आहे, अशी टीका त्यांनी केली.

१२ ते १५ माझी आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा खडसेंनी केला. तद्वतच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नाराज असलेले वृत्त काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केले होते. त्यावरती बोलताना खडसे म्हणाले, अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या पाहून माझी आणि शरद पवार यांची खूप करमणूक झाली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याची माहिती ट्विटर च्या माध्यमातून दिली आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा, असे खडसे यांनी म्हटलं.