बदललेल्या राजकीय परिस्थितीवर मनसेची महत्वाची बैठक, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सत्तास्थापनेबाबत विविध नाट्यमय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपा यांच्यातील युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग झाला. अखेर मुख्यमंत्री पदाच्या लढतीत शिवसेनेने बाजी मारली. या सर्व घडामोडीनंतर आता मनसे मात्र सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

त्या अनुषंगाने राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या मनसेच्या या बैठकीला पक्षातील सर्व सरचिटणीस, उपाध्यक्ष उपस्थित राहणार असून पक्षाची पुढील वाटचाल काय असणार आहे याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचे समोर आले आहे.

राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी युती करत सत्तास्थापन केली आहे. तर भाजपाने राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं आहे. त्यामुळे सत्तेचे समीकरणं कधीही बदलू शकतात. जोपर्यंत जनता स्पष्ट बहुमत देत नाही तोपर्यंत सत्ता स्थापन करणे हे कुठल्याही पक्षाला खूप अवघड जाते कारण जवळचे कधीही साथ सोडून दुसऱ्यांच्या गळी पडू शकतात.

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन मतदारांना केलं होतं. परंतु मनसेला राज्यात केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. मनसेने या निवडणुकीत जवळपास १०० च्या आसपास उमेदवार उभे केले होते. त्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील हेच एकमेव आमदार म्हणून निवडून आहेत. त्यामुळे मनसेला आता यापुढील रणनीती आखावी लागणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी विरोधी पक्षात बसण्याची भूमीका घेऊन निवडणूक लढविली. शहा-मोदींविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेत रान पेटवले. त्यांच्या सभांना देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला परंतु राज्यात फक्त १ जागा त्यांना मिळाली. असे असले तरी विक्रोळी, मुलुंड, मागाठणे, भिवंडी ग्रामीण, दादर-माहिम, ठाणे, शिवडी, डोंबिवली आणि कोथरुड मतदारसंघात त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

यंदाच्या विधानसभेत मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत न जाता स्वबळावर निवडणुका लढविल्या. मनसे आघाडीसोबत जाणार अशी चर्चा होती परंतु तसे काही झाले नाही. मात्र काही जागांवर आघाडीकडून मनसेच्या उमेदवारांना पडद्यामागुन साथ देण्यात आली होती. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचं सरकार आले असून या बाबत मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे एकंदरीत राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती बघता आजच्या मनसेच्या बैठकीत काय निर्णय घेतले जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Visit : Policenama.com