जालन्यात पुन्हा दानवे Vs औताडे सामना रंगणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कॉंग्रेसने आपल्या ३५ लोकसभा उमेदवारांची ७ वी यादी जाहिर केली आहे. राज्यातील चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, भिवंडी, लातूर या ५ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित केली. यात जालन्यातून १६ व्या लोकसभा निवडणूक लढविलेल्या विलास औताडे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना भाजप युतीतील मोठ्या नाट्यानंतर शिवसेनेच्या अर्जून खोतकर यांचे बंड थंड करत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता जालन्यात दानवे – औताडे सामना रंगणार आहे.

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींचा पुन्हा औताडेंवर विश्वास

जालना मतदारसंघातून सलग पाचव्यांदा भाजपने विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्यांच्याविरोधात कॉग्रेस कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या महाराष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे आणि सभापती भीमराव डोंगरे यांची नावे चर्चेत होती. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने आणि १९९९ पासून आपले वर्चस्व दानवेंनी जालन्यात प्रस्थापित केल्याने कॉंग्रेसकडून कोणाला उमेदरावरी द्यायची यावर बरेच विचारमंथन केले गेले. माजी आमदार कल्याण काळे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे २०१४ च्या निवडणूकीत दानवे यांना टक्कर देणारे विलास औताडे यांच्याच नावावर कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले.

जालना लोकसभा मतदारसंघात १९७७ व्यतिरिक्त १९८९ पर्यंत कॉंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यानंतर मात्र भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जालना मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ३ भाजपकड़े, २ शिवसेनेकडे तर १ कॉंग्रेसकडे आहे. सलग ७ निवडणूकांमध्ये या मतदारसंघात भाजपने आपले प्राबल्य राखले आहे. १९९६ पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. १९९९ पासून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे या मतदारसंघात वर्चस्व आहे.

दानवे, खोतरकर यांच्यात खरंच दिलजमाई झाली का ?

मागील काही वर्षात खोतकर आणि दानवे यांच्या एकत्र येण्याने भाजप शिवसेना युतीची ताकद वाढली होती. दानवे खोतकर एकत्र आल्याने युतीची शक्ती मागील काळात वाढली होती. २००९ मध्ये कॉंग्रेसची या मतदारसंघातील स्थिती मजबुत होती. तरीही त्यांनी कल्याण काळे यांचा ८ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांच्याच साथीने १६ वी लोकसभा निवडणूक लढविली. त्यावेळी निवडणूकीत रावसाहेब दानवेंनी विलास औताडे यांचा २ लाख ६ हजार ७९८ मतांनी पराभव केला होता. परंतु यावेळी रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकर यांच्यात लोकसभा उमेदवारीवरून संघर्ष सुरु झाला. त्यानंतर रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहिर केल्यावर खोतकर पुन्हा आक्रमक झाले होते. त्यांची शिवसेना, भाजपमधील श्रेष्ठींनी समजूत घातली. त्यानंतर त्यांनी माघार घेतली. तत्पुर्वी दानवे यांनी शिवसेनेविरोधात खुप कठोर टीका केली होती. हे ताजेच आहे. त्यामुळे दानवे खोतकर यांची खरेच दलजमाई झाली आहे का?हा खरा प्रश्न आहे.

आमदार बच्चू कडूंची भूमिका महत्वाची

शेतकऱ्यांविरोधात अपशब्द वापरल्याच्या मुद्द्यावरून रावसाहेब दानवेंना टक्कर देण्याचे आव्हान देत आमदार बच्चू कडूंनीही दंड थोपटले आहेत. त्यांनी राज्यभरात संघर्ष यात्रा काढून रान पेटवले होते. प्रहार पक्षाकडून ते दानवेंना आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जालना मतदारसंघात त्यांनी उमेदवारी जाहीर केल्यास खरे चित्र स्पष्ट होईल.

जालना मतदारसंघात दानवे, खोतकर यांची दिलजमाई झाल्याचे चित्र असले तरी त्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे दानवेंसाठी ही लढत महत्वाची ठरणार आहे. औताडे यांची प्रतिमा स्वछ असतानाही २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याने त्यांचा पराभव झाला होता. तर कॉंग्रेस पक्षात आपापसातील मतभेद विसरून एकत्र आल्यास औताडे यांच्यासाठी ही खुप मोठी मदत ठरेल आणि दानवे आणि औताडे यांच्यातील लढत चुरशीची होईल .