‘ही घटना मानवतेला काळीमा फासणारी, सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेयसीवर अ‍ॅसिड टाकून आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील येळंब घाट परिसरात समोर आली आहे. यात त्या जखमी तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यी झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी ट्विट केले आहे. एका तरुणीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, 12 तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22, रा. शेळगाव, ता. देगलूर, जि. नांदेड ) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा-केज या मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर तरुणाने रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अ‍ॅसिड टाकले, काही वेळाने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. त्यानंतर, आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती.

उपचारादरम्यान मृत्यू
दुर्दैवी म्हणजे, पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी 2 वाजेपर्यंत तडफडत होती. काही वेळानंतर रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेली तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. जखमी तरुणीला स्वत : च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण ती 48 टक्के भाजल्यामुळे तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.