आता राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग ! भाजपसोबत गेलेल्या अपक्षांचा ‘महाविकास’कडे ‘मोर्चा’, ‘हे’ 3 आमदार NCP च्या वाटेवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजकारणात काहीही होऊ शकते आणि सत्तेसाठी राजकीय मंडळी कोणताही निर्णय घेऊ शकतात. याची प्रचिती महाराष्ट्रातील जनता गेल्या तीन – चार महिन्यांपासून अनुभवत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपच्या दिशेने सत्तेचे वारे वाहत होते तेव्हा भाजपमध्ये मेगा भरतीसाठी नेत्यांची झुंबड उडाली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर नेत्यांनी आपला मोर्चा महाविकास आघाडीकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. राजकीय निष्ठा बाजूला सारून राजकीय नेते सत्तेच्या दिशेने जात आहेत.

भाजप सत्तेवर येणार म्हणून अनेक नेते भाजपमध्ये आले. तर काही भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आले आणि भाजपसोबत राहिले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या अपक्षांची सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीकडे पावले वळताना दिसून येत आहेत.

करमाळ्याचे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर भाजप सत्ताधारी होईल. म्हणून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पाच वर्षे विरोधात बसावे लागणार आणि त्यामुळे मतदार संघातील कामं होणार नाही या कारणांमुळे अपक्ष सत्ताधारी पक्षांकडे वळत आहेत.

Visit : policenama.com