‘भारताने पाकिस्तानबरोबर खेळायला हवे’ : ‘या’ ऑलिम्पिकप विजेत्या कुस्तीपटूचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. अवंतीपुरा येथे हा हल्ला झाला. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. शहीदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवाय अनेकजण जमेल त्या रुपाने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करत आहेत. अशातच आता भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळू नये अशी जोरदार मागणी होताना दिसत आहे. यानंतर आता भारतासाठी दोन ऑलिम्पिकपदके जिंकून इतिहास रचणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमारचे मत मात्र यापेक्षा वेगळे आहे. हा हल्ला दुर्दैवी आहे असे म्हणत भारताने पाकिस्तानशी खेळायला हवे, असे मत सुशील कुमारने व्यक्त केल्याचे दिसत आहे.

सुशील म्हणाला की, “पुलवामा येथील हल्ला निंदनीय आहे. मी भारताच्या जवानांना सलाम करतो. मी त्यांना सांगू इच्छितो की, संपुर्ण देश तुमच्या पाठिशी आहे. पण या हल्ल्यानंतरही मला असे वाटते की भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे. कारण खेळामुळे दोन्ही देशांतील संबंध चांगले राहतील आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.”

पाकिस्तान संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतून हकालपट्टी करा : बीसीसीआय करणार मागणी
प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना आयसीसीला पत्र लिहिण्यास सांगितले आहे. शिवाय त्यात पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यापासून रोखावे अशी विनंती करण्याचंही राय यांनी सुचवलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या अनेक माजी खेळाडूंनीही भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळू नये असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( पीसीबी) चिंतेचं वातावरण पसरलं असल्याचं दिसत आहे.