न्यूझीलंड दौर्‍यासाठी ‘टीम इंडिया’ जाहीर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- आगामी न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती घेतलेल्या रोहित शर्माचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तसेच युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. संजूला रिषभ पंतऐवजी खेळवण्यात आले होते. संजूला फक्त दोन सामनेच खेळण्याची संधी दिली आणि त्यानंतर त्याला संघातून बाहेर काढले आहे. दरम्यान, हार्दिक पंड्यासुद्धा भारतीय संघाकडून न्यूझीलंड दौर्‍यात खेळू शकणार नाही.

असा आहे भारताचा संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंडमधील हे सामने 24 जानेवारीपासून सुरू होत आहेत. तत्पूर्वी तंदुरूस्ती चाचणीत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याने भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. तो न्यूझीलंडमध्ये खेळू शकणार नाही. पांड्याच्या कमरेला दुखापत झाल्याने तो चार महिन्यांपासून संघाच्या बाहेर होता. चार महिन्यानंतर तो तंदुरुस्त होऊन पुनरागमक करेल, असे वाटत असताना तंदुरुस्ती चाचणीत तो अपयशी ठरल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

संघनिवडीपूर्वी ही तंदुरूस्ती चाचणी शनिवारी मुंबईत घेण्यात आली होती. यानंतर भारतीय संघात हार्दिक पांड्या खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. पांड्याऐवजी तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकर यास भारत अ संघात संधी मिळाली आहे. भारत अ संघ न्यूझीलंडमध्ये तीन लीस्ट ए सामने खेळणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/