शरद पवारांनी दिले राजकारण व समाजकारणातील नव्या भूमिकेचे ‘संकेत’, त्याच विधानाची सर्वत्र ‘चर्चा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय आणि समाजकारणातील नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. राज्य 60 व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि मी 80 व्या वर्षात पदार्पण करतोय. आता या वयात आपण थांबायाचं, आता कसलं व्हिजन बघतं बसायचं. व्हिजन बघण्यासंबंधित काम नव्या पिढीकडे द्यायचं आणि आपण बघत बसायचं त्यांच्याकडे. सध्या मी तेच करतोय. त्यांच्याकडे काम सूपुर्द केलं आहे आणि मी पाहत आहे. काही अडचण आली, विचारलं तर सांगायचं असे सांगत शरद पवार यांनी आपल्या राजकीय आणि समाजकारणातील भविष्याचे संकेत दिले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांदरम्यान मी आता सक्रीय निवडणूका लढणार नाही असेही ते म्हणाले. वयाच्या या टप्प्यात व्हिजन सांगणं योग्य नाही तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात हे पाहायचं. ते करत असलेल्या कामात हस्तक्षेप करायचा नाही. असेही ते एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान म्हणाले. तरुणांना व्हिजन देत मी त्यांचे काम पाहत असतो, त्यांनी विचारलं तर सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणं आणि कामात सतत हस्तक्षेप करणं योग्य नाही, त्यामुळे तुमचा मान राहत नाही असे ही ते यावेळी म्हणाले.

राज्यातील सरकारबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल. काँग्रेसमध्ये निर्णय घेण्यासाठी दिल्लीत जावे लागते. शिवसेनेचे निर्णय मुंबईतच होतात. आज काँग्रेसने निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. सहकार्य करायचे आणि सरकार टिकवायचे ही भूमिका काँग्रेसमध्ये दिसते. शिवसेना म्हणून आमचा शिवसेनेशी कधी संपर्क आला नाही. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे मित्र होते. त्यांच्याशी खूप संपर्क होता, एखादा शब्द दिला तर तो पूर्ण करायचे असे देखील पवारांनी सांगितले.

राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे आणि मला स्वत:ला या सरकारबद्दल कुठलीही शंका नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारचे नेतृत्व ज्यांच्या हाती आहे ते सर्वांना सोबत घेऊन चालणार आहेत, दुसऱ्यांच्या कामात ते अजिबात हस्तक्षेप करत नाही असे ही म्हणाले.