मनसेचा तृप्ती देसाईंना ‘टोला’, इंदोरीकर महाराजांचा ‘हा’ व्हिडीओ पाहाच

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे गेल्या काही दिवसापासून गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आले होते. काहींनी इंदोरीकर महाराजांच्या विधानावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण अनेक संघटना इंदोरीकर महाराजांच्या समरणार्थ पुढे आल्या आहेत.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा या आग्रही मागणीसाठी अहमदनगरमध्ये जाऊन पोलीस अधिक्षकांना निवेदन दिलं होतं. त्यांनी इंदोरीकर महाराज नेहमी कीर्तनातून महिलांचा अपमान करतात असा आरोप केला आहे. ४ दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास त्यांच्या तोंडाला काळ फासू असा इशारा दिला आहे. मात्र मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यावरुन त्यांना प्रतिइशारा दिला होता.

मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी इंदोरीकर महाराजांचा महिलांवरील जुना व्हिडिओ व्हायरल करुन तृप्ती देसाईंवर पुन्हा निशाणा साधला आहे, या व्हिडिओत महाराज म्हणतात की, १ हजार मुलांमध्ये ९३५ मुली असा जन्मदर आहे. ६५ मुली हजाराला कमी आहे, याला एकमेव कारण सोनोग्राफी आहे, मुलगी व्हायलाच पाहिजे, जगातील सर्वात मोठं पाप स्त्रीभ्रूण हत्या आहे. या व्हिडिओत इंदोरीकर महाराज मुलींचे महत्त्व समाजाला कीर्तनातून सांगत असल्याचं दिसतं आहे. मुलींसाठी अनेक योजना सरकार देतं त्याचा फायदा घ्या असं महाराज कीर्तनातून सांगताना दिसत आहेत.

आरोग्य विभागाने इंदोरीकरांच्या विधानावरुन त्यांना नोटीसही पाठवली होती. इंदोरीकर महाराजांनी दोन दिवसांपूर्वी या नोटिशीला उत्तर दिलं होत. मी तसे बोललोच नाही. ज्या तारखेचा उल्लेख करून नोटीस पाठवली, त्या तारखेला कीर्तन झालेच नाही असं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळं हे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. मात्र मुंबईमध्ये बातमी छापून आली होती, त्यांना कोठून पुरावे मिळाले हे त्यांना विचारले आहे, मात्र त्यांनी अजून उत्तर दिलेले नाही. त्यामुळे कारवाई करणं शक्य नाही असे अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी स्पष्ट केलं होतं.