मावळमध्ये बाणाला मत देण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या लढत होत आहे. मावळ मतदारसंघामध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याची लेखी तक्रार एका महिलेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या महिलेने मतदान केंद्रावर नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून बळजबरीने शिवसेनेला मतदान करण्यास सांगण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

हा प्रकार मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड येथे घडला आहे. याप्रकरणी हुमरा पठाण यांनी लेखी तक्रार केली आहे. पठाण या जयवंत भोईर प्राथमिक शाळेत मतदानासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मतदान केंद्रातील अधिकारी निकाळजे हे मतदारांना शिवसेनेला मत देण्यास सांगत असल्याची तक्रार पठाण यांनी केली आहे. त्यामुळे हा अचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत हुमरा पठाण यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदान होत असून यामध्ये मावळ लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. या मतदार संघातून अजित पवार यांचे चिरंजीव निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.