राज्यात आंतरजिल्हा ST बस सेवा अन् कोचिंग क्लासेस सुरु होणार ! मंत्री विजय वडट्टीवार यांचे संकेत

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, एसटी बस सेवा मागील काही महिन्यांपासून बंद आहे. आता राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा कोविड नियम पाळून सुरु करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केली आहे. कोरोनाचे संकट वाढत असले तरी एका एसटी बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरु करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे.

एसटी बस सेवा सुरु करण्यासोबतच राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून सुरु करण्याची तयारी सरकारने दाखवली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्हाधिकार कार्यालयात आज सकाळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरोग्य प्रशासनाची प्रशंसा केली. तसेच वर्तमान स्थिती पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व रिक्त पदं तातडीने भरण्याची घोषणा केली.

तसेच ऐन कोरोना संकट काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. प्रसंगी मेस्मा लावणार असल्याचे सांगत चंद्रपूर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील 5 डॉक्टरांना नोटीसा जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.