भाजपचं अजित पवारांना सोबत घेण्याचं ‘गणित’ चुकलंच, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची ‘मन की बात’

पटणा : वृत्तसंस्था – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेणे हे चुकीचं गणित आणि चुकीचं धाडस होतं असं मत बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजपाचे नेते सुशील मोदी यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेविषयी बोलताना सुशील मोदी म्हणाले की, ‘लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीत जिंकलो म्हणून विधानसभाही जिंकूच असं समजणं बरोबर नाही. 2003 मध्ये अटलजींच्या काळात राजस्थान, मध्य प्रदेशच्या विधानसभा आम्ही जिंकलो होतो, पण नंतर लोकसभेला पराभव झाला. महाराष्ट्रात नेमकं काय झालं, हे ठाऊक नाही; पण अजित पवारांना सोबत घेणं हे चुकीचं गणित आणि चुकीचं धाडस होतं. अजित पवार आमदार घेऊन येतील असं वाटलं, पण ते आणू शकले नाहीत. मात्र राजकारणात हार-जीत होतच असते. जे झालं त्याबद्दल वाईट वाटतं.’

अतिविश्वासामुळे भाजपने महाराष्ट्राची सत्ता गमावली –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपने भूपेंद्र यादव यांच्यावर सोपवली होती. फडणवीस सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार यांचा पाठिंबा घेण्याच्या निर्णयप्रक्रियेत भूपेंद्र यादव यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अजित पवार यांची पक्षातील नाराजी ओळखून भूपेंद्र यादव यांनी त्यांच्याशी बोलणी सुरू केली. अजित पवार यांच्या पाठीशी राष्ट्रवादीतील बहुतांश आमदार आहेत, अशी समजूत होती. याच समजूतीने भाजपचा घात केला.अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले आणि सर्व आमदार माघारी परतले. यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केले आहे.

Visit : Policenama.com