दुर्देवी ! म्यानमारमध्ये जेडच्या खाणीत दरड कोसळल्याने 50 जणांचा मृत्यू

यांगुन : वृत्तसंस्था – म्यानमारच्या उत्तरेकडच्या भागात एका जेडच्या खाणीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी (दि.2) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे. या ढिगाऱ्याखाली किमान 200 जण दबल्याची भीती वर्तवण्यात येत असून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.


म्यानमारमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. जेड खोदण्याचं काम सुरु असताना पावसामुळे चिखलाचा मोठा ढिगारा कोसळल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिक अग्निशमक दलाने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. म्यानमारमधील उत्तरेकडील काचीन येथील जेड खाणीत ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत कार्य सुरु केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, म्यानमारच्या उत्तरेकडील जेड खदानीत ही दुर्घटना घडली असून दुर्घटना घडली त्यावेळी 200 कामगार याठीकाणी काम करत होते. काही कामगार जेड स्टोन खोदण्याचे काम करत होते. तर काही कामगार जेड दगडाचे तुकडे शोधण्यात व्यस्त होते. अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने हे कामगार ढिगाऱ्या खाली दबले गेले. यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.