Coronavirus : ‘कोरोना’च्या प्रकोपानंतर टोकिओ ऑलिम्पकबाबत मोठी अपडेट

टोकिओ : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप पहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. यामधून बाहेर कसे पडायचे याबाबत कडक पावले उचलली जात आहेत. कोरोनामुळे काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला टोकिओमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. पण आता टोकिओमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकबाबत एक मोठी अपडेट येत आहे.

जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा टोकिओमध्ये होणार आहे. जपान सरकारमधील एका प्रवक्त्याने ऑलिम्पिकबाबत माहिती दिली आहे. या प्रवक्ताने म्हटले आहे की, टोकिओमध्ये होणारे ऑलिम्पिक हे नियोजित वेळेतच होणार आहेत. ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा आमचा कोणताही मानस नाही. कारण याबाबतचे सर्व खबरदारीचे उपाय आम्ही घेण्याचे ठरवले आहे. ऑलिम्पिक ही स्पर्धा चार वर्षांनी खेळवण्यात येते. ही स्पर्धा जपानमधील टोकिओ या शहरात होणार आहे. 24 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

जगभरातील सर्वच देशात कोरोना रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 141 पेक्षा अधिक देशात कोरोना व्हायरस पसरलेला आहे. भारतात 107 लोकांना याची लागण झाली आहे तर तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जगभरात 7 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे उद्योग धंद्यावर परिणाम झाला आहे. तसेच क्रीडा क्षेत्रावर देखील याचा परिणाम झाला आहे.